• ‘हयातीच्या दाखल्यांसाठी’ महापालिकेचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण
• दिव्यांगाचे घरोघरी जाऊन हयातीच्या दाखल्यांसाठी सर्वेक्षण करणारी पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. समाजातील विविध घटकांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी विभागाकडून विविध प्रकारे पुढाकार घेण्यात येतो. शहरातील नोंदणीकृत दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ‘हयातीचा दाखला’ आवश्यक असतो. मनपा हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तीच्या ‘हयात दाखल्या’बाबत त्यांचे घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करण्यात आले असून ६६९९ दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. दिव्यांगाच्या हयातीच्या दाखल्यामध्ये बदल, दुरुस्ती करण्यासाठी कार्यालयामध्ये न येता त्यांच्या दाखल्यामध्ये मनपा प्रशासनाकडून ‘घरोघरी’ जाऊन नोंदणी करण्यात आली.
दिव्यांगाच्या हयातीच्या दाखल्याचे घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिली व भारतातील अग्रगण्य महानगरपालिका ठरली आहे.
– ‘असे’ झाले सर्वेक्षण…
मनपा हद्दीतील नोंदणीकृत दिव्यांग व्यक्तींच्या घरोघरी जाऊन त्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यात आली. तब्बल ६,६९९ इतक्या व्यक्तींची सर्वेक्षणाच्या माध्यमातून केवायसी पूर्ण झाली असल्याने, त्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. सर्वेक्षणामध्ये व्यक्तीच्या माहितीची नोंदणी करताना अक्षांश व रेखांश (जिओ टॅंगिग)ही घेतल्याने भविष्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना मदत पोहोचविणे सोयीचे होणार आहे. सर्वेक्षणामध्ये दिव्यांगाची केवायसी पूर्ण करताना त्यांचे फेस रीडिंग थम्ब इम्प्रेशन, आयरिस स्कॅन व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून संकलित करण्यात आली. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना त्यांची केवायसी पूर्ण झाल्यानंतर हयातीचा दाखला देण्यात आला. सर्वेक्षणामुळे आता दिव्यांगाचा हयातीचा दाखला तत्काळ मिळण्यासाठी मदत होत आहे.
– २२ टक्के दिव्यांगांना हयातीचा दाखला मिळण्यास होणार मदत...
दिव्यांगाच्या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरामध्ये ६,६९९ मधील ५,२३२ जणांकडे म्हणजेच ७८ टक्के दिव्यांगांकडे यूडीआयडी सर्टिफिकेट असून १४६७ म्हणजेच २२ टक्के दिव्यांगांकडे हयातीचा दाखला नसल्याचे निदर्शनास आले; परंतु सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आता १,४६७ जणांचा हयातीचा दाखला काढण्यासाठी मदत होणार आहे. सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरामध्ये दिव्यांगामध्ये ४,५४० इतके दिव्यांग पुरुष तर २१५९ इतक्या दिव्यांग महिला आहेत. याचबरोबर, सर्वेक्षणाच्या माध्यमातून वय-वर्षे २५ ते ६० यामध्ये दिव्यांगाची संख्या जास्त असल्याचे आढळले आहे.
– ‘हे’ आहेत सर्वेक्षणाचे फायदे…
- मॅन्युअल पद्धतीने नोंदणी पद्धतीचे डिजिटलाइजेशन झाल्याने आता एका क्लिकवर माहिती होणार उपलब्ध
- दिव्यांग व्यक्तींच्या पत्त्याचे अक्षांश व रेखांश (लॅट-लॉंग) मिळाल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविणे होणार सोपे
- घरोघरी जाऊन सर्वेक्षणामुळे दिव्यांग व्यक्तींना कार्यालयामध्ये येण्याचा त्रास होणार कमी
- सर्वेक्षणामुळे महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींचा आकडा निश्चित झाल्याने आता योजनांचा लाभ पोहोचविण्यास होणार मदत
- महापालिका हद्दीतील दिव्यांगाची झोननिहाय आकडेवारी प्राप्त झाली
- दिव्यांगाच्या २१ प्रकारातील दिव्यांगांची माहिती मिळाली
0 Comments