Hot Posts

6/recent/ticker-posts

विविध कार्यक्रमांच्या जुगलबंदीने रसिक प्रेक्षक भारावून गेले.

 

          पिंपरी, दि ९ जून २०२४:- पिंपरी चिंचवड  महापालिकेच्या ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी’च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाच्या दुस-या  दिवशी शास्त्रीय गायन, सतार-व्हायोलिन जुगलबंदी तसेच कथ्थक नृत्याने उपस्थित रसिक प्रेक्षक भारावून गेले.

       महापालिकेच्या संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाने या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची दमदार सुरुवात झाली.  या विद्यार्थ्यांनी शास्रीय गायन, तबला वादन आणि हार्मोनियम वादनाने उपस्थितांची मने जिंकली. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.  त्यानंतर पंडित सुधाकर चव्हाण यांनी आपल्या शास्त्रीय गायनातून राग बिहाग सादर केला. त्यांचे गायन रसिकांच्या मनाला भिडले. त्यानंतर उस्ताद शाकीर खान आणि तेजस उपाध्ये यांच्यातील  सतार आणि व्हायोलिनच्या  जुगलबंदीचा अनोखा अविष्कार पाहायला मिळाला. या दमदार जुगलबंदीने रंगलेली एक सुरेल संध्याकाळ रसिकांनी अनुभवली. 


       पंडित श्रीनिवास जोशी आणि त्यांचे सुपुत्र विराज जोशी यांनी त्यांच्या शास्त्रीय गायनातून मालकंस राग सादर केला. ‘मदनाचा पुतळा राजस सुकुमार..........’ या अभंगाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्याच्या सुरेल गायनामुळे मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली.  पंडित दीपक महाराज यांच्या अप्रतिम कथ्थक नृत्याने  या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप झाला.  


       विश्वजित लोंढे, निखील वाघमारे, संतोष साळवे, समीर सूर्यवंशी यांनी तबल्याला समर्पक साथ दिली. हरिदास सावंत, उमेश पुरोहित,  अजरुद्दीन शेख यांनी हार्मोनियमला साथसंगत केली. तसेच बासरीच्या माध्यमातून गायकांना जयवर्धन दधीच यांनी उत्तम साथ दिली. 


  या कार्यक्रमास महापालिकेचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, समन्वयक समीर सुर्यवंशी, क्रीडा पर्यवेक्षक अरूण कडूस संगीत शिक्षक उमेश पुरोहित, स्मिता देशमुख, विनोद सुतार  तसेच  विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.

 


                        

Post a Comment

0 Comments