पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने दहशत माजवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अलीकडेच पुण्यातील शिवाजीनगर भागात कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. टोळक्याने दोघांवर जीवघेणा हल्ला केला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा कोयता हल्ल्याने पुणे हादरलं आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात टोळक्याने एका तरुणाला टार्गेट केलं आहे. आरोपींनी भररस्त्यात रक्तरंजित राडा घातला आहे. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
• दबा धरला, गाडी अडवली अन् सपासप केले वार...
नरेश रामचंद्र तिडंगे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. ते धानोरी रोड विश्रांतवाडी परिसरात काम करतात. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते कामावरून परतत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या तीन जणांनी त्यांना अडवून धारदार कोयत्याने त्यांच्यावर वार केले. यावेळी एक आरोपी नरेश यांना पकडत होता. तर दुसरा आरोपी कोयत्याने सपासप वार करत होता.
• हेल्मेट घालून आरोपींना अडवण्याचा प्रयत्न...
भररस्त्याच्या वर्दळीच्या ठिकाणीच हा खुनी खेळ सुरू होता. दरम्यान, आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी निर्दयीपणे नरेश यांच्यावर वार करत राहिले. यावेळी एका तरुणाने हेल्मेट घालून हल्लेखोराला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही हल्लेखोर आवरत नव्हता. त्याने नरेश यांच्यावर वार करणे सुरुच ठेवले. शेवटी लोकांनी घटनास्थळी गर्दी केल्यानंतर आरोपी तरुणांनी तिथून पळ काढला.
या जीवघेण्या हल्ल्यात नरेश तिडंगे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करत २ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अशाप्रकारे तीन जणांनी भररस्त्यात गाठून एकावर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
0 Comments