पिंपरी चिंचवड दि.30 जून 2024 :- ओसंडून वाहणारा जनसमुदाय... टाळ, मृदुंग आणि अभंगाच्या तालामध्ये दंग झालेले वारकरी...हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पिंपरी चिंचवड शहरात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनीही दिंडीकरी व विणेकरी यांचा सन्मान केला.
आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पिंपरी चिंचवड शहरात भोसरी फाटा दिघी येथील मॅगझिन चौकात आगमन झाले, यावेळी महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाचे आयुक्त शेखर सिंह यांनी काही अंतर सारथ्य देखील केले.
पालिकेच्या वतीने मॅगझीन चौक भोसरी फाटा दिघी येथे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या ठिकाणी आयुक्त शेखर सिंह यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकाऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत आनंद साजरा केला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, उप आयुक्त रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकरसंतपिठाचे विश्वस्त राजू महाराज ढोरे, संचालिका स्वाती मुळे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मानाच्या दिंड्यांना कापडी पिशवी, देशी वृक्षांच्या बिया, तुळशीचे रोप, संपर्क माहिती पुस्तिका आणि प्रथमोपचार पेटी देऊन सन्मान करण्यात आला.
मॅकझिन चौक येथे भाविकांनी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावर्षीही उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने पालखी स्वागताच्या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करून विठ्ठल तसेच संत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे फुलांचे छायाचित्र रेखाटण्यात आले होते.
आषाढीवारी निमित्त वृक्षारोपण, हरीतवारी असे विविध उपक्रम देखील महापालिकेच्या वतीने राबविण्यात आले आहेत. स्वागताच्या ठिकाणी महापालिकेच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभंग गायनाचा कार्यक्रम सादर केला.
दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांनी दापोडी येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटिल, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे उपस्थित होते.
0 Comments