पिंपरी चिंचवड दि. ३ जून २०२४-: निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी हा महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेऊन सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
मतमोजणी निरीक्षक मोहम्मद हारूण यांच्या प्रमुख उपस्थितीत बालेवाडी, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण आज संपन्न झाले, त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला बोलत होते. या प्रशिक्षण सत्रास मावळ लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, सुनील पांढरे, माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे समन्वय अधिकारी निळकंठ पोमण, मनुष्यबळ कक्षाचे समन्वय अधिकारी राजू ठाणगे तसेच पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे राहुल मुंडके, अजित नैराळे, जनार्दन कासार, सुरेंद्र नवले, विठ्ठल जोशी, अर्चना यादव यांच्यासह मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मावळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी ४ जून रोजी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडणार आहे. त्या अनुषंगाने सर्व व्यवस्था पुर्ण झाली असून प्रत्यक्ष मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाचा टप्पाही आज पुर्ण झाला. मावळ लोकसभेअंतर्गत सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकारी कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) पद्धतीने पनवेल, उरण, कर्जत, मावळ, पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीकामी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबतचे सविस्तर प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिले. मतमोजणी प्रक्रिया पार पाडताना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना देण्यात आल्या. मतमोजणीबाबतच्या तांत्रिक बाबी, विहीत नमुन्यांची माहिती, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी प्रवेशाबाबत सूचना.
मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने बालेवाडी येथील मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच अधिकृत माध्यम प्रतिनिधींना बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश देण्यात येईल. निवडणूक मतमोजणीसाठी प्राधिकृत केलेल्या निवडणूक कार्यालयाने दिलेले ओळखपत्र संबंधितांनी प्रवेश करत्यावेळी धारण करणे आवश्यक आहे. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राजवाडा गेटने प्रवेश दिला जाईल. १५० मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधीत करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिका तसेच आपात्कालीन विषयक सर्व यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सर्व सुविधांसह स्वतंत्र माध्यम कक्ष तयार करण्यात आला आहे. परिसरात सीसीटीव्ही यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच इतर आवश्यक सुविधा देखील याठिकाणी असणार आहेत.
मतमोजणी केंद्रात मोबाईलसह प्रतिबंधीत वस्तू आणण्यास मनाई.
निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.
मतमोजणीच्या माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९५० ची सुविधा
मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणीविषयक माहिती देण्यासाठी मतमोजणी केंद्रावर संवाद कक्ष तयार करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना मतमोजणी विषयक माहिती घेता येणार आहे.
0 Comments