• पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा: नागरिकांच्या सृजनशीलतेला महापालिकेचे व्यासपीठ.
• पर्यावरणाविषयी जनजागृती आणि आकर्षक बक्षिसे.
पिंपरी, ३० ऑगस्ट: गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिक दरवर्षी मोठ्या उत्साहाने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. नागरिकांच्या या सकारात्मक प्रतिसादाला व्यासपीठ मिळावे तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाविषयी व्यापक स्तरावर जनजागृती व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. आणि पीसीएमसी स्मार्ट सारथी यांच्या वतीने ऑनलाईन पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ
या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिक आपण साजरा करत असलेला गणेशोत्सव सोशल मिडीयाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. या स्पर्धेमुळे उत्सवामध्ये तयार करण्यात आलेली मूर्ती, सजावट करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि विसर्जन याविषयी व्यापक स्तरावर जनजागृती होणार आहे. नागरिकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा प्रसार होणार आहे. तसेच अनेक नागरिकांना या माहितीच्या आधारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास मदत होणार आहे.
आकर्षक बक्षिसांची लयलूट
स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या घरातील (घरगुती) पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि सजावट यांची छायाचित्रे तसेच गणेशमूर्ती विसर्जनाचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. सदर छायाचित्रे आणि व्हिडीओ स्पष्ट आणि मूळ स्वरूपातील असावेत. त्यामध्ये कोणतेही तांत्रिक बदल करू नयेत. व्हिडीओ जास्तीत जास्त एक मिनिटाचा असावा. छायाचित्र आणि व्हिडीओ यांचे तज्ञ परीक्षकांकडून मूल्यमापन करून विजेते निवडण्यात येतील. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तीन विजेते निवडण्यात येतील. त्यानुसार एकूण २४ विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या पारितोषिकांच्या रकमा पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक: रु. १५, ०००/-, द्वितीय क्रमांक: रु. १२,०००/- , तृतीय क्रमांक: रु. ८,०००/- .सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नागरिक सहभागी व्हावेत या उद्देशाने सोशल मिडिया इंफ्लूएन्सर्सनादेखील या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. स्पर्धेची माहिती जास्तीत नागरिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सोशल मिडिया इंफ्लूएन्सर्सना महापालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी सोशल मिडिया इंफ्लूएन्सर्सनी प्रसारित केलेल्या पोस्टला आलेल्या प्रतिसादाची आकडेवारी पुढील लिंकवर अपलोड करणे आवश्यक आहे.
लिंक:
स्पर्धेचे नियम
गणेशमूर्ती ही शाडूची माती किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेली असावी. सजावट पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेली असावी. गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात यावे व त्याचा व्हिडिओ लिंकवर पाठविणे अनिवार्य आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल अॅप डाऊनलोड करून किंवा खाली दिलेला लिंकवर क्लिक करून त्यामध्ये फोटो आणि व्हिडीओ अपलोड करणे अपेक्षित आहे.
0 Comments