• : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत १७६ उमेदवारांना नियुक्ती; प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांकडून सर्वेक्षणाला सुरुवात
पिंपरी : राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” जाहीर केली. चालू आर्थिक वर्षापासून युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी योजना सध्या राज्यभर राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून विद्यावेतन देण्यात येणार आहे. सदरची रक्कम शासनामार्फत थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे प्रशिक्षणार्थींच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा समाज विकास विभाग व लाईटहाऊस कम्यूनिटीज फाऊंडेशन संयुक्तरित्या महापालिका क्षेत्रामध्ये रोजगार सर्वेक्षण राबवित आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून १८ ते ४० वयोगटातील युवकांच्या आकांक्षा, आव्हाने आणि शैक्षणिक पार्श्वभूमी समजून घेण्यात येणार आहे.
- २४१ युवकांच्या मदतीने होणार शहरात सर्वेक्षण !
महापालिकेच्या क्षेत्रातील लाखांहून अधिक कुटुंबांचा सर्वेक्षणामध्ये समावेश असून २४१ युवकांच्या मदतीने झोपडपट्टी क्षेत्र, कमी उत्पन्न गट याचबरोबर गावठाण क्षेत्रांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी ‘फिल्ड सर्वेक्षण प्रगणक’ या पद निर्माण केले असून त्यासाठी २४१ जागा निश्चित करणेत आल्या आहेत. सदर सर्वेक्षणाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील ठोस माहिती मिळणार असून त्याआधारे कौशल्य विकास व युवकांच्या रोजगाराविषयी प्रभावी निर्णय घेता घेऊन त्याआधारे धोरणे विकसित करता येणार आहेत. जे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आणि रोजगाराच्या संधी देताना स्थानिक लोकसंख्येच्या गरजांशी सुसंगत असणार आहेत. सदर सर्वेक्षणाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व प्रशिक्षण मिळणार असून याद्वारे त्यांची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
- ‘फिल्ड सर्वेक्षण प्रगणक’ या पदासाठी १७६ उमेदवारांना नियुक्ती
‘फिल्ड सर्वेक्षण प्रगणक’ या पदासाठी १७६ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असून त्यापैकी ६६ उमेदवार रूजू झाले आहेत. रुजू झालेल्या उमेदवारांपैकी २० उमेदवारांच्या बॅचचे प्राथमिक प्रशिक्षण पुर्ण झाले असून सोमवार, दिनांक २३ सप्टेंबरपासून त्यांच्याद्वारे सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर, दुस-या बॅचचे प्रशिक्षणाससुध्दा सुरुवात झाली आहे. शहरात सुरु असलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरातील युवकांनी आवश्यक असलेली माहिती देऊन सहकार्य करावे. असे आवाहन समाज विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.
– युवकांच्या कौशल्य विकासासाठी व रोजगार निर्मितीसाठी महापालिका सदैव तत्पर !
‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’ अंतर्गत बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून महानगरपालिकेमध्ये घेण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन देण्यात येणार असून त्यांना शासनामार्फत डीबीटाद्वारे थेट बॅंक खात्यामध्ये जमा करणेत येणार आहे. शहरातील युवकांच्या कौशल्य विकासासाठी व रोजगार निर्मितीसाठी महापालिका सदैव तत्पर असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना भविष्याची सुवर्णसंधी !
शहरातील गरजू युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तसेच त्यांना कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी चिचंवड महानगरपालिका प्रयत्नशिल आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना भविष्यामध्ये रोजगाराची सुवर्णसंधी मिळणार असून त्यासाठी त्यांनी आज सदर योजनेचा लाभ घ्यावा.
- प्रदीप जाभंळे - पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महानगरपालिका
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत रुजू झालेल्या उमेदवारांद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरु !
‘फिल्ड सर्वेक्षण प्रगणक’ या पदासाठी १७६ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्यापैकी ६६ उमेदवार रूजू झाले आहेत. त्यापैकी २० उमेदवारांच्या बॅचचे प्राथमिक प्रशिक्षण पुर्ण झाले असून सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर रोजीपासून त्यांच्याद्वारे शहरामध्ये सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.
- तानाजी नरळे, सहाय्यक आयुक्त, समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
0 Comments