लोणावळा :- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१७) रात्री अकराच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली बोगद्याजवळ बिबट्याचा अपघात झाल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे एक वर्ष चार महिने वयाचा बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे समजले.
मंगळवारी सकाळी वडगाव मावळ वन विभागाच्या कार्यालयात मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. वाहनाची जोरात धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यानंतर वडगाव मावळ वन विभागाच्या कार्यालय परिसरात बिबट्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.
0 Comments