मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२५ साली कला क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २७ मे २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या विशेष क्षणानंतर, अशोक सराफ यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत भावना व्यक्त केल्या.
त्यांनी म्हटले, “पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार मानतो. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम असेच राहू द्या”
या सोहळ्याला त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासह कुटुंबीयही उपस्थित होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने मोठे योगदान दिले आहे. त्यांनी विनोदी आणि गंभीर दोन्ही प्रकारच्या भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारल्या आहेत. त्यांच्या चित्रपटातील आविष्कारामुळे प्रेक्षकांमध्ये आजही त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे.
• मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजता, टायमिंग आणि विविध भावछटांचे सशक्त सादरीकरण या बाबींसाठी त्यांना हा सन्मान मिळाला. अशोक सराफ यांचे ‘अशी ही बनवाबनवी‘, ‘धुमधडाका‘, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी‘ आणि ‘पंढरीची वारी‘ यासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या हृदयात कायमचे घर करून आहेत.अशोक सराफ यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांनी देखील केले होते. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान दिलीप कुमार यांनी सराफ यांना त्यांच्या अभिनयाच्या टायमिंगसाठी शाबासकी दिली होती. सराफ यांचा अभिनय जीवनभर अविस्मरणीय ठरला आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपार यश मिळवले असून, तो आजही मराठी रसिकांचा आवडता चित्रपट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येदेखील अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
पद्मश्री हा भारत सरकारकडून मिळणारा चौथ्या क्रमांकाचा नागरी सन्मान असून, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. अशोक सराफ यांना मिळालेला हा सन्मान मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद ठरला आहे.
0 Comments