स्वित्झर्लंड : स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगांतील एका सुंदर गावावर निसर्ग कोपला. बिर्च हिमनदीतील कडा या गावावर कोसळला. लाखो घनमीटर बर्फ, दगड व गाळ एक क्षणात डोंगरावरून खाली आला आणि संपूर्ण ब्लाटेन गाव बघता बघता मलब्यात गायब झालं. 29 मे रोजी स्वित्झर्लंडमधील व्हिलरनजीक ही दुर्घटना घडली. दृश्य इतकं भयावह होतं की गावातील उरलेली काही घरे देखील नंतर पुरात वाहून गेली. शास्त्रज्ञांनी यामागे हवामान बदलाचे दुष्परिणाम असल्याचे संकेत दिले आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण गावाचा नकाशाच बदलून गेला आहे. सुदैवाने, भूस्खलनाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने मे महिन्याच्या सुरुवातीलाच 300 रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले होते. मात्र, 64 वर्षीय एक व्यक्ती अद्याप बेपत्ता असून मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे शोधमोहिमेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
गंभीर बाब म्हणजे गाळ व दगडांचे मोठे ढीग जवळपास दोन किलोमीटर अंतरापर्यंत नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करत आहेत. यामुळे लोंजा नदीचा प्रवाह थांबून मोठे जलाशय तयार झाले असून, पाण्याची पातळी ताशी 80 सेंटीमीटरने वाढत आहे. जर हे पाणी अचानक सखल भागात आलं तर आणखी एक मोठी दुर्घटना घडू शकते.व्हालेस कॅंटनचे सुरक्षा विभागप्रमुख स्तेफान गॅंझर यांनी सांगितले की, या संकटामुळे फर्डेन धरणाला देखील धोका आहे. मात्र, ते सध्या रिकामे करण्यात आले असून, अशा आपत्कालीन परिस्थितीत पाण्याचा झटका झेलण्यासाठी तयार आहे.
स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती करिन केलर-सटर यांनी आयर्लंडमधील उच्चस्तरीय चर्चासत्रातून आपला दौरा रद्द करून, या ठिकाणी शुक्रवारपासून भेट देणार असल्याचे जाहीर केले आहे. स्विस लष्कराने मदत कार्यासाठी 50 जवान, पाण्याचे पंप, खोदकाम यंत्रसामग्री सज्ज ठेवली आहे. गावातील गुरेढोरे देखील हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हलवण्यात येत आहेत.
ब्लाटेन गावातील एक महिला म्हणाली, “मी काल सगळं गमावलं. मला आता काही बोलायचं नाही.” तिच्या डोळ्यांतील शून्यता गावाच्या उद्ध्वस्त अवस्थेला दर्शवत होती. दुसरीकडे, सांस्कृतिक अभ्यासक वर्नर बेलवाल्ड यांनी सांगितले की, “1654 साली बांधलेलं आमचं घर या गाळाखाली नाहीसं झालं आहे. आता तिथे काहीही उरलेलं नाही.”या दुर्घटनेमागे हवामान बदलाचे स्पष्ट संकेत आहेत, असे स्वित्झर्लंडच्या ग्लेशियर मॉनिटरिंग विभागाचे प्रमुख मॅथियस हुस यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की, “ज्या ठिकाणी शेकडो वर्षांपासून काहीच घडलं नव्हतं, तिथे आता अनपेक्षित घटना घडत आहेत. ही निसर्गाची चेतावणी आहे.”
ब्लाटेन गावावर आलेल्या या आपत्तीने केवळ निसर्गाच्या ताकदीची झलक दाखवली नाही, तर हवामान बदलामुळे येणाऱ्या संभाव्य संकटांचीही जाणीव करून दिली आहे. आता या भागात पुन्हा जीवन सुरळीत होईल का, हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या संपूर्ण स्वित्झर्लंड एक दु:खद धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
0 Comments