Hot Posts

6/recent/ticker-posts

चालेरा रुग्णालय बर्न वॉर्ड टेंडर प्रक्रियेत अपारदर्शकता – ठेकेदारांना लाभ देण्यासाठी महापालिका प्रशासनाची पद्धतशीर खेळी?

 

      पिंपरी चिंचवड – चिंचवडगाव येथील महापालिका रुग्णालयात जळालेले व भाजलेले रुग्ण (Burn Patients) यांच्यासाठी प्रस्तावित असलेल्या बर्न वॉर्डच्या उभारणीसाठीची टेंडर प्रक्रिया महापालिकेने अलीकडेच सुरू केली. मात्र, ही प्रक्रिया फारच अपारदर्शक व नियोजित पद्धतीने ठराविक ठेकेदारांच्या फायद्यासाठी राबवली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

     सदर टेंडर फक्त ८ दिवसांसाठीच खुली ठेवण्यात आली असून, महापालिकेतील काही अधिकारी ठराविक ठेकेदारांना आतून माहिती पुरवत आहेत, अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे. परिणामी, इतर पात्र, अनुभवी आणि गुणवत्ताधारक कंत्राटदारांना सहभागाची संधीच दिली जात नाही. काम पूर्वनियोजित पद्धतीने ठराविक मंडळींकडेच जाणार असल्याची शक्यता असल्याने, संपूर्ण प्रक्रियेवर संशयाचे सावट आहे.


      यापूर्वीही अशाच पद्धतीने YCM रुग्णालयातील OT चे टेंडर ठराविक ठेकेदारालाच देण्यात आल्याचा आरोप झाला होता. आता त्याच साखळीचा पुढचा भाग म्हणून चालेरा रुग्णालयातील बर्न वॉर्डचे टेंडर देखील त्या दिशेनेच जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते.

       बर्न वॉर्ड ही केवळ एक इमारत नसून ती रुग्णांच्या जीविताशी संबंधित एक तांत्रिक आणि अत्यंत संवेदनशील यंत्रणा असते. अशा सुविधा गुणवत्ताधारक व अनुभवी ठेकेदारांकडूनच उभारल्या गेल्या पाहिजेत. मात्र, सध्याची टेंडर प्रक्रिया ही “नावापुरते स्पर्धात्मक पण प्रत्यक्षात ठरवलेलेच काम” अशा स्वरूपात राबवली जात आहे.

      या प्रकाराला जोरदार विरोध करत, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव श्री. सुनिल कांबळे यांनी आयुक्त मा. शेखर सिंह साहेब यांना लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी: संपूर्ण टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्याची, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची, आणि टेंडर प्रक्रिया पुन्हा पारदर्शक रितीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

     “नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कामांमध्ये अपारदर्शकता व भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून जनतेसोबत आंदोलन छेडावे लागेल,” असा स्पष्ट इशारा सुनिल कांबळे यांनी दिला.

       आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की महापालिका प्रशासन या तक्रारीची गंभीर दखल घेते का, की पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासाला तडा जातो?


Post a Comment

0 Comments