पुणे : हिमालयाच्या बर्फाच्छादित डोंगर डोळ्यात भरून ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पुण्याच्या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयाचे मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. नितीन नागनाथ अभिवंत (वय ४२) यांचे हिमालयातील बुरान व्हॅली तेथे निधन झाले. ट्रेकिंग करत असतानाच अचानक श्वासोच्छवासात अडथळा आल्यामुळे डॉ. नितीन अभिवंत यांचा मृत्यू झाला. डॉ. अभिवंत हे गिर्यारोहणाचे शौकीन होते. महाविद्यालयातील मित्रांसह ते शनिवारी मुंबईहून हिमालयात ट्रेकिंगसाठी निघाले होते.
सोमवारी सकाळी गिर्यारोहणाला सुरूवात तेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच डॉ. अभिवंत यांना प्रचंड धाप लागली, घाम फुटला आणि श्वास घेणंही कठीण झालं. सोबत असलेल्या दोन डॉक्टर मित्रांनी तातडीने प्रथमोपचार केले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉक्टर अभिवंत यांनी सोलापूर येथे ५ वर्ष सेवा दिल्यानंतर २०१४ पासून ते ससून रुग्णालयात मनोविकृतीशास्त्र विभागात कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनाने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. गिर्यारोहणाचा छंद जोपासणारे डॉ. अभिवंत हे त्यांचे पेशंट आणि सहकारी यांच्यात लोकप्रिय होते, त्यामुळे त्यांच्या जाण्याचा पेशंट आणि सहकाऱ्यांना धक्का बसला आहे.
डॉक्टर अभिवंत यांच्या मृत्यूने ससून रुग्णालयातील एक तज्ज्ञ, संवेदनशील आणि माणुसकी जपणारा डॉक्टर हरपला आहे. गिर्यारोहणाचा छंदच त्यांचा घात करेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं, त्यांची आठवण आणि योगदान कायम लक्षात राहिल, अशी प्रतिक्रिया ससून रुग्णालायातील त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.
0 Comments