• महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) मोहिमेचे आयोजन.
पिंपरी चिंचवड दि.२८/०९/२०२४-: जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने प्राणी कल्याण करणे,मनुष्य श्वान संघर्ष कमी करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मा.श्री शेखर सिंह आणि मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीविजयकुमार खोराटे,उप आयुक्त श्री संदीप खोत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचाव तसेच ‘रेबिजमुक्त पिंपरी चिंचवड ’ करण्याच्या उद्देशाने संपूर्ण शहरा मध्ये अँटी रेबीज लसीकरण हा आणखी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी दिनांक २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाचे आयोजन केले जाते. ‘रेबीजचे सीमोल्लंघन’ (ब्रेकिंग रेबीज बॉर्डर्स) ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाची संकल्पना आहे. याच पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने रेबीज निर्मूलन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने 28/09/2024 ते 5/10/2024 पर्यंत लसीकरण मोहीम व जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहे.
0 Comments