• पिंपरीत होणार मराठा समाजाचे धरणे आंदोलन.
पिंपरी चिंचवड दि.२२/०९/२०२४-: गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत याबाबत राज्य सरकारने वेळोवेळी विविध आश्वासने दिली परंतु ती पाळली नाहीत.
मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट,बॉम्बे गॅझेट,लागू करावे सरकारने दिलेल्या आश्वासनां प्रमाणे सगे सोयरे बाबतच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. या बरोबरच सरकारने वेळोवेळी दिलेल्या सर्व आश्वासनांची तात्काळ अंमलबजावणी करावी.
या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत त्यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. याकडे सरकारने तात्काळ लक्ष द्यावे तसेच सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी जरांगे पाटील यांच्या समर्थनात पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाज आज सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे धरणे आंदोलन करणार आहे.
यासाठी रविवारी दुपारी दोन वाजता मराठा समाजाची मीटिंग दिनकर भोईर व्यायाम शाळा चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकार करत असलेल्या चालढकली बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच लवकरात लवकर सरकारने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.सोमवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात शहरातील मराठा बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. या बैठकीस सचिन बारणे,सतीश काळे,प्रकाश जाधव,जीवन बोराडे,अभिषेक म्हसे,नकुल भोईर,अर्जुन खामकर वाल्मीक माने,प्रकाश बाबर,प्रशांत पाटील,सुलभा यादव,उज्वला साळुंखे,दिलीप गावडे,रमेश कदम,अच्युत मस्के,राज पाटील,यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते.
0 Comments