पिंपरी :- कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण खून प्रकरणातील सात आरोपींना न्यायालयाने दहा वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींनी १० डिसेंबर २०१४ रोजी प्रकाश चव्हाण याचा पूर्णानगर, चिंचवड येथे गोळ्या झाडून निघृण खून केला होता.
प्रकाश सिंग बायस, दिलीप विठ्ठल कांबळे, अनिल लक्ष्मण सपकाळ, अमोल नारायण शिंदे, अमर दिनकर शेवाळे, शाम चंद्रकांत जगताप, संजय नारायण शिंदे, अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश चव्हाण याची स्वतःची एक गुन्हेगारी टोळी होती. टोळीचा म्होरक्या प्रकाश चव्हाण याची परिसरात दहशत होती. या टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी आरोपींनी आपसात संगनमत करून प्रकाश चव्हाण याचा गेम करण्याचा प्लॅन केला. प्रकाश चव्हाण यांच्या हालचालीवर आरोपी पाळत ठेवून होते. दरम्यान, १० डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रकाश चव्हाण पूर्णानगर येथील एका सलूनमध्ये गेला. त्यावेळी हल्लेखोर सलून बाहेर दबा धरून बसले होते. प्रकाश चव्हाण सलूनच्या बाहेर येताच आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. तसेच धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रकाश चव्हाण याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या हल्ल्यात प्रकाश चव्हाण याचे अंगरक्षक देखील जखमी झाले. तसेच, एका आरोपीचा घटनेदरम्यान झालेल्या अपघात मृत्यू झाल्याची नोंद आहे.
याप्रकरणी निगडी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी तात्काळ निष्पन्न केले. तसेच आरोपींना बेड्या ठोकून त्यांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, वाहने आणि इतर साहित्य जप्त केले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस.बी नाईकपाटील, आर.बी उंडे यांनी दोषारोपपत्र वेळेत पाठविले होते.
0 Comments