नवी दिल्ली : कोविड-19 ने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चीन, सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडसारख्या आशियाई देशांमध्ये कोविड-19 ची एक नवीन लाट आली आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात चिंता वाढली आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईतील केईएम रुग्णालयात कोविड पॉझिटिव्ह दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोविड-19 च्या रुग्णांमध्ये होत असलेल्या या वाढीचे मुख्य कारण नवीन ओमिक्रॉन सबव्हेरियंट्स, जसे की JN.1 आणि त्याचे संबंधित व्हेरियंट LF7 असल्याचे मानले जात आहे.
सिंगापूरमध्ये मे 2025 च्या सुरुवातीलाच या संसर्गामुळे बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढून 14,000 पेक्षा जास्त झाली. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या 11,100 होती. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र अतिदक्षता विभागातील (ICU) रुग्णांमध्ये थोडी घट झाली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सध्याचे व्हेरियंट्स पूर्वीच्या तुलनेत अधिक संक्रामक किंवा गंभीर नाहीत. या वाढीचे कारण लोकांची कमी झालेली प्रतिकारशक्ती असू शकते. सध्या LF.7 आणि NB.1.8 व्हेरियंट्स प्रमुख आहेत, जे JN.1 चेच व्हेरियंट्स आहेत.
0 Comments